भंडारा - लॉकडाऊनच्या काळात स्पर्धा परीक्षेचे ज्ञान मिळविणे विद्यार्थांना कठीण झाले होते. यावर उपाय शोधत एका शिक्षकाने मोबाईल ॲप, यूट्यूब चॅनल आणि वेबसाईटची निर्मिती केली. त्यामाध्यमातून 48 हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले आहे. त्यांच्या या मोफत शिक्षणाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे उत्कृष्ट कार्य -
सतीष चिंधालोरे असे या प्रयोगशील शिक्षकाचे नाव आहे. ते मूळचे मोहाडी तालुक्यातील आहे. मात्र सध्या लाखनी तालुक्यातील खराशी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ते शिक्षक आहे. ते 2010 साली शाळेतत रूजू झाले. गावातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिकविणे सुरू केले. दरवर्षी विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे. 2018 मध्ये शिष्यवृत्ती आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत बसलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी आपले ज्ञान सर्वदूर पोहचविण्याचे ठरविले आणि युट्युब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू केले. लॉकडाऊन सुरू झाल्यावर त्यांनी यामध्ये भर घालत स्वतः मोबाईल अॅप आणि बेवसाईट बनवली.
48 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले शिक्षण -
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेसाठी लागणारा अभ्यास मोफत शिकविण्यासाठी त्यांनी स्वतः मोबाइल अॅपची निर्मिती केली. शिवाय एक वेबसाईट आणि यूट्यूब चॅनल देखील सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना विषय समजावून देणे, प्रश्न उत्तर आणि परीक्षा घेणे, हे तीन वेगवेगळ्या टप्प्यात घेतात. त्यांची शिक्षण शैली हळूहळू विद्यार्थांना आवडायला लागली आणि आज 48 हजार विद्यार्थी त्यांचे व्हिडिओ बघून शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेसाठी लागणारा अभ्यास मोफत शिकविण्यासाठी त्यांनी स्वतः मोबाइल अॅपची निर्मिती केली. शिवाय एक वेबसाईट आणि यूट्यूब चॅनल देखील सुरू केले आहे.
ऑनलाईन शिक्षणाचा झाला फायदा -
लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. मात्र यामध्ये केवळ नियमित विषयच विद्यार्थ्यांना शिकविले जातात. 4 थी आणि 8 व्या वर्गात असलेल्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती परीक्षा असतात. तसेच नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. मात्र याचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. सतीष चिंधालोरे या शिक्षकाने सुरू केलेल्या मोफत ऑनलाईन शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांनी घेत शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. तसेच काही विद्यार्थींनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला आहे.