भंडारा - लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व वैध दारू दुकाने, बिअर बार बंद आहेत. त्यामुळे तळीरामांची फजिती होत आहे. शेवटी या तळीरामांनी आपला मोर्चा गावाच्या दिशेने वळविल्याने गावातील मोहफूल दारूच्या अड्यावर गर्दी जमू लागली आहे. त्यामुळे जिल्हाभर पोलिसांनी या मोहदारू निर्मिती करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत आतापर्यंत 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 242 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कायदेशीर दारूची दुकाने बंद झाल्याने बेकायदेशीर मोहदारूची मागणी वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यानासुद्धा ऊत आले. बऱ्याच गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात ही मोहदारू बनवायला सुरुवात केली. त्यामुळे गावकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्याने पोलिसांनी माहितीच्या आधारे विविध ठिकाणी धाड सत्र सुरू केले. काही गावात लोकांनी स्वतः हे दारू अड्डे पोलिसांच्या मदतीने उद्धवस्त केले. या महिन्याभरातच्या कालावधीत जिल्ह्याभरात पोलिसांनी कारवाई करत अनेक दारूचे अड्डे उद्धवस्त केले असून 212 गुन्ह्यांमध्ये २४२ आरोपी केले आहे. त्यांच्या कडून 3304 लीटर हात भट्टीची दारू आणि 16, 337 किलो सडवा, देशी/विदेशी 1256 लीटर दारू जप्त करण्यात आली असून त्यांच्या कडून ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. एकंदरीतच लॉकडाऊनच्या काळातही एवढ्या मोठ्या प्रमाणत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अवैध धंदे सुरू कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.