भंडारा- रस्ते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेत दोन अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन दाखल झाले आहेत. या वाहनांतील लेझर स्पीडगन, टिंट मीटर आणि ब्रिथ अनॉलायझरच्या माध्यमातून वाहनांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करणे सोयीचे होणार आहे. या वाहनांच्या माध्यमातून जिल्हाभर मोहीम राबवली जाणार आहे.
रस्त्यावर धावणाऱ्या सुसाट वाहनांमुळे निष्पाप जीवांचा बळी जात आहे. आता अपघातावर नियंत्रण व्हावे. जनतेत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून राज्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्र व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असे इंटरसेप्टर वाहन पुरविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील शाखेत दोन वाहन तीन दिवसांपूर्वी दाखल झाले आहेत. एक वाहन जिल्हा वाहतूक शाखेला आणि एक गळेगाव येथील महामार्ग पोलीस पथकाकडे देण्यात आलेले आहे.
या वाहनात लेझर स्पीडगन असून त्याद्वारे वाहनांचा वेग मोजता येणार आहे. सदर लेझर स्पीडगनचा वापर करून अमर्यादित वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे सोपे जाणार आहे. यासाठी वाहन मालकाच्या मोबाईलवर तत्काळ संदेश जाईल. यामुळे जिल्ह्यातील वाहन चालक आपल्याला वाहनांचे वेग मर्यादित ठेवून वाहन चालवतील. वाहनामध्ये टिंट मीटर उपलब्ध आहे. वाहनांच्या काचांवरील काळ्या रंगाच्या फिल्मची तपासणी याद्वारे केली जाईल. काळ्या रंगाची फिल्म 80 टिंटपेक्षा अधिक असता, कामा नये त्यामुळे काळा काचांच्या वाहनावर कार्यवाही करणे सोपे जाईल. तसेच या वाहनांमध्ये ब्रिथ अॅनालाझर उपकरण राहणार असून मद्यप्राशन करणाऱ्या वाहन चालकांची तत्काळ तपासणी केली जाईल सदर उपकरणाद्वारे वेळीच प्रिंट काढून माहिती प्राप्त होईल अत्याधुनिक वाहनांच्या माध्यमातून जिल्हाभर तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
यात आधुनिक वाहनामुळे जिल्ह्यातील अमर्याद वेगाने वाहन चालवणे यावर मद्यप्राशन करून वाहन चालविणे यावर आणि काळ्या काचा लावून वाहन चालवण्यावर बंधने लावता येईल.