भंडारा - कृष्णमूर्ती स्थापन करून कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याची शेकडो वर्षांची परंपरा यावर्षीही भंडारा जिल्ह्यात कायम राहिली. मात्र, कोरोनामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींची उणीव नक्कीच भासत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. तसेच यावर्षी कोरोनामुळे कृष्णमूर्ती विक्रीवरही परिणाम झाल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.
भंडारा शहरामध्ये दोन दिवस कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा होतो. 60 टक्के घरांमध्ये कृष्णाची मूर्ती स्थापन करून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. जन्माष्टमी साजरी करण्यासाठी कामानिमित्त बाहेर गेलेले कुटुंबातील सदस्य घरी परत येतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे कुटुंबातील इतर सदस्य येऊ शकले नाहीत, याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली. असे असले तरी वडिलोपार्जित परंपरा जपण्यासाठी नागरिकांनी कृष्णमूर्तींची स्थापना करून त्यांना पंचपक्वन्नाचा नैवेद्य दिला. दरवर्षी कुटुंबातील सदस्यांसह शेजाऱ्यांनाही भोजनाचे निमंत्रण दिले जाते व दुसऱ्या दिवशी वाजत-गाजत या मूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे सर्व विधी शांततेत केले जात आहेत. मूर्तींचे विसर्जनही घरीच केले जाणार असल्याचे भाविकांनी सांगितले.
भंडारा शहरात दसरा मैदानावर सर्व कुंभार बांधवांनी कृष्णमूर्ती विक्रीसाठी ठेवल्या होत्या. भाविकांनी कृष्णमूर्ती खरेदी करण्यासाठी कालपासूनच गर्दी केली होती. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षी गर्दी दिसली नाही. मूर्तींच्या विक्रीवर त्याचा परिणाम दिसून आला. ग्रामीण भागातील लोक मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेच नसल्याचे कुंभार बांधवांनी सांगितले. कोरोनामुळे यावर्षी मूर्ती निर्मितीसाठी लागणारे रंग आणि इतर साहित्य हे बाहेरून आणता आले नसल्याने मूर्ती बनवण्यासाठी खर्चही जास्त लागला. मात्र, त्या मोबदल्यात भाव मिळत नसल्याने कुंभार बांधवाना फटका बसला.