भंडारा - मागील काही महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज जिल्ह्यात 846 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, 218 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हा उद्रेक पाहता जिल्हा प्रशासनाने अधिक कडक निर्बंध केले असून, दंडाच्या स्वरुपातही वाढ केली आहे. तसेच, रात्रीची संचारबंदी वाढविण्यात आली आहे.
हेही वाचा - भंडारा जिल्ह्यातील दोन सीबीएसई शाळांवर दंडात्मक कार्यवाही
22 दिवसांत 14 हजारवरून 20 हजार कोरोना रुग्ण
10 मार्चला भंडारा जिल्ह्यात एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या केवळ 57 होती. आज हा आकडा वाढून 846 च्या घरात गेलेला आहे. 10 मार्चला कोरोनाबाधित एकूण रुग्ण 14 हजार 57 होते. तर, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 20 हजार 17 कोरोनाबाधित झाले असून, 15 हजार 287 नागरिक हे कोरोना आजारापासून मुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 4 हजार 379 अॅक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आता पर्यंत 351 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.37% एवढे आहे.
आजपासून रात्रीचे निर्बंध वाढले
कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्ह्यात अधिक कडक निर्बंध लावले आहेत. आज काढलेल्या आदेशानुसार आता रात्रीची संचारबंदी रात्री दहा ते सकाळी सात ऐवजी रात्री आठ ते सकाळी सात अशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे, आज रात्री आठ वाजेपासून ही संचारबंदी सुरू होणार असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
मास्क न घालणाऱ्या लोकांवर दंड वाढला
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने बाजारपेठा सायंकाळी 7 वाजताच बंद करण्याचे आदेश या अगोदरच काढले आहेत. तसेच, आजपासून मास्क न घालणाऱ्या लोकांवर शंभर ऐवजी दोनशे रुपये दंड आकारला जाईल. तर, दुकान मालक, आस्थापने, उद्योजक, संस्था चालक यांनी त्यांच्या आस्थापनात, दुकानात मास्क न वापरल्यास त्यांच्यावर पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल, तसेच सॅनिटाईझींगची व्यवस्था दुकानाबाहेर न केल्यास त्यांच्यावर हजार रुपये दंड आकारण्यात येईल, यासह सात दिवसांसाठी त्यांची आस्थापने बंद ठेवण्यात येतील. सभागृह, मंगल कार्यालये, अशा सार्वजनिक ठिकाणी 50 पेक्षा जास्त लोक आढळल्यास त्यांच्यावर दहा हजारांचा दंड आकारण्यात येईल.
आज पर्यंतचे सर्व आकडे मोडीत
सध्या विदर्भात नागपूरमध्ये दरदिवशी सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आढळत असून, नागपूर खालोखाल विदर्भात दरदिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळून येत आहेत. त्यामुळे, प्रशासन प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अधिक गांभीर्याने पावले उचलत असल्याचे दिसत आहे. आज संचारबंदी आठ वाजेपासून सुरू झाल्याने पोलीस विभाग आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कार्यवाही करताना कोणतीही हयगय केली जाणार नाही, अशा सूचना वारंवार पोलीस विभागातर्फे देण्यात येत आहे.
हेही वाचा - भंडारा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही