भंडारा- थंड पाणी म्हणजे आरओचे पाणी अशी लोकांची समज झाल्याने थंड पाण्याचा हा नवीन व्यवसाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. फक्त भंडारा शहरात ५० हुन अधिक आरओचे प्लांट आहेत. या प्लांटमधील पाणी लोकांच्या घरी, दुकानात, समारंभात वाटप केले जाते. मात्र, हे पाणी खरोखरच आरओचे आहे का? शासनाने आरओच्या पाण्यासाठी जे निकष ठेवले आहे ते निकष हे प्लांट पूर्ण करतात का? हे तपासणारी कोणतीही यंत्रणा सध्या नाही. त्यामुळे साधे पाणी थंडगार करुन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.
मागील काही वर्षापासून सीलबंद पाण्याचे चलन वाढले आहे. सुरुवातीला काही नावाजलेल्या कंपन्या सीलबंद बॉटल्स आणि जारचे पाणी विकायचे नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरओचे प्लांट सुरू झाले. सुरुवातीला काही समारंभात या पाण्याचा वापर केला जायचा. कालांतराने या पाण्याची मागणी वाढू लागली. आता बहुतांश दुकानात, घरी, लग्नसमारंभात आणि इतरही कार्यक्रमात नागरिक फक्त आरओचे पाणी वापरतात आणि याच संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात प्लांट सुरू झाले.
न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत पूर्णपणे रान मोकळे
2015 -16 दरम्यान अन्न व औषध विभागामार्फत या प्लांटची तपासणी केली गेली. यामध्ये शासनाच्या निकषानुसार सुरू नसणाऱ्या आरओ प्लांटचा परवाने विभागामार्फत रद्द करण्यात आले होते. मात्र, याविरुद्ध संबंधित लोक उच्च न्यायालयात गेले. आमच्यावर अन्न व औषध विभागामार्फत केलेली कार्यवाही ही अवैध असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अन्न व औषध विभागामार्फत या प्लांटची तपासणी पूर्णपणे बंद आहे. म्हणजेच अवैध पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत पूर्णपणे रान मोकळे आहे.
संपूर्ण जिल्ह्यात आरओचे प्लांट बनवले गेले आहेत. त्यामध्ये केवळ बोटावर मोजण्याइतके प्लांट नियमांचे पालन करतात. उर्वरित लोक साध्या पाण्याला थंडगार बनवून कॅनद्वारे आरओचे पाणी म्हणून लोकांना देतात. पाणी एवढे थंडगार असते की त्यामध्ये पाण्याची चव लक्षातच येत नाही. त्यामुळे थंडगार पाणी म्हणजे आरोग्यदायक पाणी अशी लोकांची समज झाली आहे.
या थंड पाण्याच्या गोरख धंद्या विषयी अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना विचारले असता त्यांनी जोपर्यंत न्यायालय यावर कोणताही निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करू शकत नाही असे सांगितले.