भंडारा - पवनी शहराच्या मुख्य रस्त्यांवर मागील 4 ते 5 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असल्याने नागरिकांना चालण्यासाठी आणि वाहतुकीसाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. रस्त्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असूनही नगरपालिका आणि बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक संतापले आहेत.
याआधीही हे खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांनी बरेचदा आंदोलन केले. एका आंदोलनात तर चक्क 'बेशरम' असे लिहिलेले झाड खड्ड्यात लावण्यात आले. मात्र, अधिकारी आणि राजकीय लोकांवर त्याचा प्रभाव पडला नसल्याने हे खड्डे आजही तसेच आहेत.
वर्षभरापूर्वी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'खड्डे दाखवा, बक्षीस मिळवा' अशी घोषणा केली होती. त्यानंतर काही रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा तयार झालेल्या या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले गेले.
पवनी तालुक्यातील या मुख्य रस्त्यांवर शाळेतील बस, ऑटो रिक्षा, वाळूचे ट्रक व इतर सर्वच वाहनांची ये-जा होत असते. अवजड वाहनांमुळे हे रस्ते वारंवार खराब होतात. त्यातच, मागील पंधरा-वीस दिवसात पवनी तालुक्यात तीनदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे या रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्यांना लवकरात-लवकर दुरुस्त करून भविष्यात होणारे दुर्दैवी अपघात टाळावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.