भंडारा - जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ होत असून सोमवारी पारा हा ४४ अंशापर्यंत पोहोचला होता. एप्रिलमध्ये तापमानात एवढी वाढ झाली तर मे महिण्यात परिस्थिती या पेक्षा अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस तापमानात अशीच वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वाढत्या उन्हामुळे भंडारेकर चांगलेच हैराण झाले आहेत.
मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्यातील तापमान ३८ अंश होते. त्यानंतर हवामान खात्याने २३ तारखेपासून मध्यम ते तीव्र उष्ण लहरी तयार होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तेव्हापासूनच तापमानात सतत वाढ होत आहे.
सोमवारी भंडारा जिल्ह्याचे कमाल तापमान ४४ अंश तर किमान तापमान २९ अंश होते. वाढलेल्या तापमानामुळे रस्त्यांवर नागरिकांची रेलचेल कमी झाली आहे. दुपारनंतर तर अतिशय महत्वाचे काम असल्यास नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. कामानिमित्त्य बाहेर पडलेले नागरिक लिंबू पाणी, लस्सी, शरबत, उसाचा रस घेऊन स्वतःला उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेचच उन्हाचा त्रास काही प्रमाणात कमी करण्यासाठी लोकांनी घरासमोर, दुकानांसमोर ग्रीन नेट लावली आहे.
त्यामुळे वाढत्या उन्हाच्या काळात नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.