भंडारा - शेतकऱ्यांसह नागरिक चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात होते. अखेर गुरुवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. या पावसानंतर मशागतीच्या कामाला सुरूवात करण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सकाळी नागरिक झोपेत असताना साडेपाच वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास 1 तास मुसळधार पाऊस कोसळत राहिला. या पहिल्याच पावसामुळे शहरातील नाल्या भरून वाहू लागल्या. मैदानात, घराच्या अंगणात, रस्त्यावर पाणी साचले. या पहिल्या पावसामुळे जमीन सुखावली आणि वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
मागील कित्येक दिवसापासून काळे ढग यायचे, मात्र पाऊस काही येत नव्ह्ता. जून महिना संपत येत असूनही पाऊस न आल्याने शेतकरी चिंतातूर होते. मात्र आज आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची काही प्रमाणात चिंता कमी केली आहे. आता पावसाला सुरुवात झाली असून हा पाऊस नियमित झाला, तर शेतीच्या कामाला सुरुवात होईल.