भंडारा - जिल्ह्यातल्या तुमसरसह मोहाडी तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी लावली. यामध्ये पिकांचे मोठ नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दोन ते तीन दिवसामध्ये विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.
पहाटे 3 वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. मोहाडी तालुक्यात वादळवारा आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे.
या पावसामुळे शेतात उभे असलेले गहू, तुर, हरभरा या पिकांचे किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी शेतात गहू कापून ठेवला होता त्याचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी केंद्रावर ठेवण्यात आलेल्या धान्याचे मोठे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.