भंडारा - सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला असून सध्या शेती कामाला वेग आला आहे. शहरात नव्याने बांधलेल्या अनियोजित नाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्यामुळे नागरिकांना या नालीच्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
जूनच्या सुरवातीच्या आठवड्यापासून पडणारा पाऊस या वर्षी मात्र खूप उशिरा आला. गुरूवारी पहाटे बरसलेल्या पाऊसनंतर दिवसभर आभाळ निरभ्र होते. शुक्रवारीही चांगलीच ऊन पडल्याने एक दिवस येऊन पाऊस नाहीसा झाल्याचे दिसत होते. पण, दुपारनंतर काळे ढग दाटून आले आणि अर्ध्या तासानंतर मेघ गर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला.
दमदार पडलेल्या पावसाने नाल्या भरून वाहू लागल्या. तसेच नुकत्याच नवीन बनाविलेल्या नाल्या मधून पाणी जात नसल्याने नाल्यांचे पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहचले. तसेच रस्त्यावर सुध्दा पाणी साचल्याने दुचाकी चालकांना आणि पायी जाणाऱ्या लोकांना या घाण साचलेल्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत होती.
जोरदार बरसलेल्या पावसामूळे नागरिकांची चांगलीच फजीती झाली आहे असून पाऊस मोठ्या प्रमाणत आल्यास परिस्थिती या पेक्षा विदारक होईल याचीच चिंता येथील नागरिकांना आहे. यातच सलग दोन दिवस मुसळधार पाऊस बरसल्याने शेतकऱयांनी शेतीच्या मशागतीला सुरूवात केली असून पेरणीसाठी या पावसाचा फायदा होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.