भंडारा - ओबीसी वर्गातील विविध मागण्या घेऊन ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने 'अर्धदफन' आंदोलन करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील मांडगी गावातील वैनगंगा नदीच्या पात्रात स्वत:ला वाळूत दफन करत ओबीसी क्रांती मोर्चाचे संयोजक संजय मते यांच्या नेतृत्वात 8 ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या हक्काची मागणी केली.
शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
ओबीसी क्रांती मोर्चा तर्फे मागील तीन वर्षांपासून विविध मागण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन आणि मोर्चे काढले गेले. मात्र शासन या आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे, स्वत:ला वाळूत अर्ध दफन करत, शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तुमस तालुक्यातील माडगी गावातील वैनगंगा नदीत हे एक दिवसीय आंदोलन केले गेले.
काय आहेत मागण्या?
ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, रद्द झालेले ओबीसी चे राजकीय आरक्षण परत द्यावे, नॉन क्रिमिलियर अट रद्द करावी, ओबीसींना पदोन्नती द्यावी आणि इतर बऱ्याच मागण्यांना घेऊन हे आंदोलन केले गेले. ह्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधुन घेण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्च्याने हे अर्धदफन आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. जर शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर आम्ही भविष्यात याच वाळूमध्ये पूर्ण दफन आंदोलन करू, यामध्ये आमचे प्राणही गेले तरी चालेल असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.
सर्वच पक्षातील शासनकर्त्यांनी केले दुर्लक्ष
देशाचे पंतप्रधान ओबीसी असतांनाही देशात ओबीसीची जनगणना का होत नाही? सन 2006 मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री स्वरुपसिंग नाईक यांच्या अध्यक्षेतेखाली ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना झाली होती. या समितीनेही राज्यसरकारी नोकऱ्यांमध्ये 19 टक्के आरक्षण दयावे, अशी महत्वपुर्ण शिफारस केली होती. पण त्या शिफारसीकडे सर्वच पक्षातील शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केले, असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
हेही वाचा - #MH BIG BREAKING : कोल्हापुरात मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन; समरजीत घाटगे सहभागी होणार