भंडारा - मोहाडी तालुक्यातील जांभोरा गावात गोवर्धन पूजेनिमित्त एक अनोख्या, मात्र अंगावर रोमांच निर्माण करणाऱ्या प्रथेचे पालन करण्यात येते. गुराख्याच्या अंगावरून गाई नेण्याची ही परंपरा गेल्या 200 वर्षांपासून सुरू आहे. गोवर्धन पूजेच्या दिवशी गुराख्याच्या अंगावरून गाई नेल्याने गावात रोगराई येत नाही, असा गावकऱ्यांचा समज आहे.
गुराख्याच्या अंगावरून जातात शेकडो गाई
मोहाडी तालुक्यातील जांभोरा गावात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. वर्षभर गावातील गुराखी ज्या गाईंना जंगलात चरायला नेतो, त्या सर्व गाई गावात एका ठिकाणी एकत्र आणल्या जातात. ज्या गुराख्याच्या अंगावरून या गाई जाणार असतात, त्याच्या हातात काठी आणि घोंगडे देऊन त्याला औक्षण केले जाते. त्यानंतर या गुराख्यासह संपूर्ण गावाची प्रदक्षणा घालण्यात येते. गावातील जेवढे मंदिरे आहेत, तेवढ्या देवांची गुराखी पूजा करतो. त्यानंतर हनुमान मंदिरासमोर हा गुराखी जमिनीवर झोपतो, आणि या शेकडो गाई या गुराख्याच्या अंगावरून जातात. मात्र प्रथा सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत यामध्ये कोणतीही दुर्दैवी घटना झाली नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.
गावावर येणारे संकट टळतात
ही परंपरा मागील 200 वर्षांपासून चालत आली आहे. वर्षभर ज्या गाईंना अनावधानाने मारल्या जाते. त्या गाईंची क्षमा मागण्यासाठी या प्रथेचे पालन करण्यात येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गोवर्धन पूजेच्या दिवशी अंगावरून गाई नेल्याने सर्व संकटे दूर होतात. ही पूजा करण्यात आली नाही, किंवा प्रथेचे पालन करण्यात आले नाही, तर गावावर संकटे येऊ शकतात. असा येथील ग्रामस्थांचा समज आहे. दरम्यान ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, आणि या पुढेही सुरू राहील असे येथील गुराख्यांनी सांगितले.
हेही वाचा - नागपूरच्या हुतात्मा जवानावर 'या' कारणामुळे आज नाही, तर सोमवारी होणार अंत्यसंस्कार
हेही वाचा - नागपुरात मंदिरे उघडण्याची लगबग सुरु; 'मास्क'सह 'ही' बंधने पाळावी लागणार