भंडारा - केंद्र सरकारतर्फे 21 जून पासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम पुन्हा सुरू झालेली आहे. कोविन अॅपद्वारे नोंदणी करुन ५० टक्के तर ५० टक्के प्रत्यक्षपणे दुपारी 12 ते ४ यावेळेत हे लसीकरण पार पडणार आहे. आज लसीकरण सुरू झाल्यानंतर तरुण-तरुणींनी लस घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
कुठे सुरू आहे लसीकरण -
18 वर्षा वर्षावरील नागरिकांसाठी शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली होती. मात्र, लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने ही मोहीम 8 ते 10 दिवस चालल्यानंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात 22 जूनपासून 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात नागरी आरोग्य पथक भंडारा अंतर्गत नगर परिषद गांधी विद्यालय, ग्रामीण रुग्णालय मोहाडी, लाखनी, लाखांदूर, उपजिल्हा रुग्णालय तुमसर, साकोली, तर प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी, गोबरवाही, नाकाडोंगरी, धारगाव, पिंपळगाव, सावरला, एकोडी या ठिकाणी सकाळी 12 ते 4 वाजे दरम्यान हे लसीकरण करण्यात येणार आहे.
30 ते 44 वयोगटातील लसीकरण 19 जूनपासून सुरू -
राज्य आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे जिल्ह्यात सामान्य रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय तुमसर, उपजिल्हा रुग्णालय साकोली, ग्रामीण रुग्णालय पवनी या पाच लसीकरण केंद्रात ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण १९ जूनपासून सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व जनतेच्या सुविधेकरीता २१ जूनपासून कोविन अॅपद्वारे ५० टक्के नोंदणी करुन व ५० टक्के प्रत्यक्षपणे लसीकरण होणार आहे. सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय मोहाडी, ग्रामीण रुग्णालय सिहोरा, ग्रामीण रुग्णालय लाखनी, ग्रामीण रुग्णालय पालांदूर, ग्रामीण रुग्णालय लाखांदूर, भंडारा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धारगांव, पहेला, शहापूर, मोहदूरा, उपकेंद्र परसोडी (शहापूर) आणि आयुधनिर्माणी हॉस्पिटल जवाहरनगर, मोहाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वरठी, करडी व आंधळगांव, तुमसर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी, साकोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सानगडी, लाखनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगांव, पवनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा आणि लाखांदूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा येथे नव्याने ३० ते ४४ या वयोगटातील कोविड-१९ लसीकरणाकरीता जिल्ह्यात एकूण २४ लसीकरण बुथची निर्मिती आरोग्य विभाग प्रशासनाकडून करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी दिली.
भंडारा शहरासाठी विशेष मोहीम -
भंडारा शहरासाठी विशेष मोहीमेंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दररोज आणि नागरी आरोग्य केंद्र 22 व 23 जूनला, तर स्प्रिंग डेल शाळा, गांधी शाळा, हुतात्मा स्मारक, निशा स्कूल, रमाबाई आंबेडकर वार्ड बुद्ध विहार येथे 24, 25 आणि 26 तारखेला लसीकरण केले जाणार आहे. तरी परिसरातील लोकांनी त्यांच्या जवळच्या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके यांनी दिली.