भंडारा - महिला सरपंच आणि दोन महिला सदस्यांची महिला ग्रामसेविकेसोबत हाणामारी झाल्याची घटना सिलेगावात घडली. तुमसर पंचायत समिती अंतर्गत सिलेगाव येते. घरकुल ठरावाची प्रोसिडिन्ग कॉपी मागण्यावरून हा वाद झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
घरकुल वाटपाच्या ठरावावरून वाद
सिलेगाव ग्रामपंचायत येथे शिवस्वराज दिनाच्या कार्यक्रम होता. त्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमानंतर ग्रामसेविका मंजूषा सहारे व सरपंच संध्या पारधी यांच्यात घरकुल वाटपाच्या ठरावावर वाद झाला. महिला सरपंच संध्या पारधी व महिला ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्यातील वाद वाढत गेला. सरपंच संध्या पारधी यांनी ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्याकडून प्रोसिडिंग कॉपी हिसकवण्याचा प्रयत्न सुरू झाला. यावेळी ग्रामपंचायत महिला सदस्य मनीषा राहंगडाले यांनी ग्रामसेविकेला जातीवाचक शब्द बोलल्याची माहिती आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामसेविकेने महिला सदस्येच्या कानशिलात लावली. त्यानंतर दोन्ही महिलांमध्ये हाणामारी झाली.
सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
सरपंच व इतर सदस्यांनी महिला ग्रामसेविका सहारे यांना मारहाण केली व प्रोसिंडिंग कॉपी हिसकावून नेली. हा वाद अखेर सिहोरा पोलिसात गेला असून त्याची तक्रार नोंदवण्यात येत आहे. शिवस्वराज्य दिनी महिला पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील मारहाण चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हे दाखल झाले नसल्याची माहिती आहे.