भंडारा - कार आणि दुचाकी गाडीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तर कारमधील दोन असा चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. अपघात राष्ट्रीय महामार्ग 6 वरील भंडारा तालुक्यातील पलाडी या गावाजवळ झाला आहे. मृतकामध्ये आमगाव येथील दोन तरुण असून दोन एक भंडारा शहरातील असल्याचे पुढे आले आहे. तर चौथ्या व्यक्तीचे नाव समजले नाही. सुधीर मते ( वय 32 वर्ष), शशिकांत सार्वे (वय 27 वर्ष, आमगाव )व पार्थ पंचभाई ( वय 18 वर्ष रा खोकरला ) यांचा यात मृत्यू झाला आहे.
शनिवारी 12 वाजेच्यादरम्यान सुधीर मते व शशिकांत सार्वे दोन्ही राहणार आमगांव (दीघोरी) हे आपल्या दुचाकी क्र. एम एच 36 एस 1886 ने आमगाव दिघोरीवरुन भंडाराकड़े जात होते. यावेळी विरुद्ध दिशेने भंडाराकडून साकोलीकड़े येणाऱ्या कार क्र. एम एच 36 झेड 7514 ने धडक दिली. चारचाकी अतिशय वेगाने असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीने दुचाकीला जोरदार धडक देत चार ते पाच वेळा उलटली. या भीषण अपघातात चारचाकीचा अक्षरशः चुराडा झाला.
या भीषण अपघातात दुचाकी चालक सुधीर मते याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला शशिकांत सार्वे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर चारचाकीमधील पार्थ पंचाभाई याचाही घटनास्थळी मृत्यू झाला आहे. गाडीत बसलेल्या तीन जखमींना उपचारासाठी भंडारा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अद्याप त्याचे नाव समजू शकले नाही. त्यामुळे मृतांची संख्या 4 झाली असून, जखमींची संख्या 2 झाली आहे. जखमींवर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. एका छोट्याशा आमगावतील दोन तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.