भंडारा - मंगळवारी (दि. 12 मे) पहाटेच्या सुमारास तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न यांसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन टिप्पर चालक व दोन मालकांचा समावेश असून चौघांनाही पवनी पोलिसांनी अटक केली आहे.
चारही आरोपी नागपूर येथील रहिवासी आहेत. मंगळवार (दि. 12मे) सकाळी 6 वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परला तहसीलदारांनी पकडले होते. टिप्पर चालकांना पुढील कारवाईसाठी टिप्पर तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. मात्र, आरोपींनी टिप्परने तहसीलदाराचे वाहन चिरडण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी तहसीलदार गजानन कोकड्डे यांनीनी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली होती.
या तक्रारीवरून दोन टिप्पर, (क्र. एम एच 40 बीएल 8674 व क्र. एम एच 49 ए टी 8675), एक चारचाकी (क्र. एम एच 40 - 8675) ही वाहने जप्त केली. सरफराज उर्फ कल्लू सकीम खान (वय 23 वर्षे), मो. कलाम मो. अजीज खान (वय 36 वर्षे), अतेकुल रहमान कादिर खान (वय 32 वर्षे) व रबूल नयमूल खान (वय 40 वर्षे, सर्व रा. नागपूर) या चौघांना पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या पथकाने नागपुरातून अटक केली.
या प्रकरणी आरोपींविरोधात भा. दं. वि.च्या विवध कलमान्वये तसचे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे ह्या करीत आहेत.
हेही वाचा - भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; टिप्पर चालक, मालक फरार