भंडारा - जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा येथील भंडारा-पवनी रोडवर एचपी पेट्रोलपंपासमोर उभ्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. आग लागतच प्रसंगावधान राखून चालकाने उडी घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शुक्रवारी दुपारी पवनी-भंडारा रोड मौदावरून ब्रह्मपुरीला जाणारी ट्रक (क्रमांक एमएच ३४ एबी ६३९० ) कोंढा गावाच्या पेट्रोल पंपसमोर उभा करून क्लिनर पाणी आणायला गेला. तेवढ्यात अचानक ट्रकला समोरून आग लागली. ही गोष्ट लक्षात येताच चालकाने ट्रकमधून उडी घेतली. ४५ डिग्री तापमानामुळे आग झपाट्याने पसरली.
पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिकांनी पंपावरील पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. आग विझविण्यासाठी अग्निशामक गाडीला बोलाविण्यात आली होती. मात्र, तिला पोहोचण्यात खूप उशीर लागला. हा ट्रक पेट्रोल पंपच्या पुढे थांबला होता. ट्रकच्या डिझेल टाकित स्फोट झाला असता तर मोठा अपघात झाला असता. मात्र, पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्याने सतर्कता दाखवत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
मात्र, या याआगीमुळे संपूर्ण ट्रक जळाल्याने ट्रक मालकाचा मोठे नुकसान झाला आहे. या आगीमुळे जवळजवळ १ तास वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे दोन्ही मार्गवर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रकला आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी बॅटरीमध्ये शार्ट सर्किट लागल्याची प्राथमिक माहिती आहे.