भंडारा - महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी पासून सुरू केलेल्या 'शिवभोजन' थाळीचा खरा लाभार्थी कोण ? हा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे. कारण दहा रुपयांमध्ये जेवण मिळत असल्यामुळे सर्वच स्तरातील लोक हे जेवण जेवायला येत आहेत. ही योजना सुरु झाल्यानंतर 27 जानेवारीला त्याचा आढावा घेण्यासाठी गेल्यानंतर गरीब लाभार्थ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेत केवळ 20 टक्के गरीब लाभार्थी भोजन करताना दिसले. उर्वरित 80 टक्के लोक हे मध्यमवर्गीय आणि शासकीय कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा... 'शिवभोजन'ला बोगस लाभार्थ्यांचं ग्रहण, ठेकदाराचीच माणसंच घेत आहेत लाभ
भंडारा जिल्ह्यात महसूल कॅन्टीन आणि जिल्हा परिषद कॅन्टीनमध्ये ही योजना सुरू करण्यात आली. रविवार 26 जानेवारीपासून याची सुरूवात झाली. मात्र, 27 जानेवारी म्हणजे दुसऱ्याच दिवशी, या ठिकाणी आढावा घेतला असता एक वेगळेच चित्र पहायला मिळाले.
भंडाऱ्यातील या दोन्ही कॅन्टीनमध्ये गरीब आणि गरजू लोकांची संख्या फक्त 20 टक्के असल्याचे आढळून आले. तर उर्वरित 80 टक्के लोक हे मध्यमवर्गीय होते. यातही काही शासकीय कर्मचारी आणि राजकीय नेते मंडळीही असल्याचे आढळून आले. या मंडळींनीही दहा रुपये देत आपल्या गरीबीचे प्रदर्शन केले.
हेही वाचा... पालकमंत्री मुश्रीफांनी घेतला शिव भोजन थाळीचा घेतला आस्वाद
'जेवणासाठी येणार्यांना आम्ही थांबवू शकत नाही. फक्त शासकीय अधिकारी, कर्मचारी असल्यास त्यांना आम्ही या थाळीची लाभ देत नाही. त्यांच्या व्यतिरिक्त मात्र इतर कोणीही असेल, तर त्याला आम्ही जेवणासाठी थांबवू शकत नाही. याचे कारण तसा कोणता नियम नाही' असे शिवभोजन थाळी योजना चालवणाऱ्या महिला बचत गटाच्या अध्यक्षांनी सांगितले.
हेही वाचा... भूक लागलेल्या प्रत्येकासाठी 'शिवभोजन' - आदित्य ठाकरे
दररोज किमान 100 थाळींचे लक्ष या दोन्ही विक्रेत्यांना आहे. यामध्ये दोन चपात्या, दीडशे ग्राम भात डाळ आणि भाजी दिली जाते. सध्या मिळत असलेल्या जेवणाची चव समाधानकारक असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.