भंडारा - कोरोनाच्या कालावधीत आम्ही बरेच कोरोना योद्धे बघितले. विविध क्षेत्रातील हे कोरोना योद्धे जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. याच कोरोना कालावधीमध्ये प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकांविषयी आणि त्यांच्या कोरोना काळातील संघर्षाविषयी तुम्हाला सांगणार आहोत....
कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्भवती महिलांना खूप लवकर होऊ शकतो आणि म्हणून गर्भवती महिलांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर निघू नये, असं वारंवार शासनातर्फे सांगितले जाते. मात्र, याला अपवाद ठरत आहे ती भंडारा येथे राज्य परिवहन महामंडळमध्ये कार्यरत असलेल्या मंजुषा नागदेवे. मागील नऊ वर्षापासून मंजुषा येथे कार्यरत आहेत. खरंतर मंजुषा यांना सध्या आरामाची गरज आहे, कारण त्या आठ महिन्यांच्या गर्भवती आहेत. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी आणि मनात भीतीचे सावट असतानाही मंजुषा दररोज त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी हजर राहतात. सुट्टी घेतली तर पैसे कापतील, पैसे कापले तर गृहस्थी चालवणे कठीण जाईल आणि म्हणून मला माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी रोज जोखीम घेत कामावर यावे लागते, असे मंजुषा सांगतात.

हेही वाचा - काझीरंगा राष्ट्रीय उद्यान लवकरच पर्यटकांसाठी खुले!
मंजुषाप्रमाणेच इथे काम करणाऱ्या इतर महिला वाहकसुद्धा कुटुंब आणि त्यांचे कर्तव्य यामध्ये सांगड घालत दररोज कर्तव्यावर हजर असतात. आम्हाला कोरोनाची भीती वाटते. मात्र, कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी या कोरोनाला घाबरण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करून कामावर येणे हेच आमचे कर्तव्य आहे, असे त्या सांगतात. नागरिकांना आता कोरोनाची भीती राहिली नाही. त्यामुळे बरेच प्रवासी हे मास्क घालत नाही. मात्र, त्यांच्या आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी या वाहक त्यांना मास्क घालायला लावतात. स्वतःची काळजी घेऊन शक्य तेवढं कोरोनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, लोकांकडून पैसे घेणे किंवा लोकांना तिकीट देणे, बसमधील गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होत नसल्याने त्यांना कोरोनाची सतत भीती असते. मात्र, कर्तव्यापुढे ही भीती ठेंगणी होत असल्याचे या महिला सांगतात.

हेही वाचा - शेतकऱ्यांना मदत मिळणार, हवामान खात्याच्या अंदाजानंतरच - सत्तार
राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या महिला वाहकांना दररोज प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करावे लागतात. हे कर्तव्य बजावत असताना या महिलांना दररोज नवनवीन लोकांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे भीतीचे वातावरण त्यांच्या मनात असले तरी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या महिला या सर्वांवर मात करून रोज आपले कर्तव्य पार पाडतात. आपल्या जिद्दीने आणि धैर्याने दररोज कोरोनावर मात करून आपले कर्तव्य निर्भयतेने पार पडणाऱ्या या रणरागिनींना 'ई टीव्ही भारत'चा मानाचा मुजरा.