भंडारा - शहरात रस्त्यांवर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रविवारी सायंकाळी एका तरुणाचा जीव गेला. रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवताना त्याची दुचाकी घसरली, यानंतर पाठीमागून येणाऱ्या एसटी महामंडळाची बस तरुणाच्या अंगावरून गेली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत नानाजी नवखरे (35) असे मृत तरुणाचे नाव असून तो भंडारा शहरातील रहिवाशी आहे.
हेही वाचा... कोरोना विषाणू : आई-मुलीचा भावूक क्षण, हवेत मारली मिठी
संपूर्ण भंडारा शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरून लोक दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, तरीही नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
हेही वाचा... 'राजकारण असो वा आरोग्य, डॉक्टरचा सल्ला घेणे कधी सोडायचं नाही'
खांब तलाव ते शीतला माता मंदिर या रस्त्यावरून रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान प्रशांत नवखरे हा खांब तलाव चौकाकडून राजीव गांधी चौकाकडे दुचाकीने जात होता. वाटेत येणाऱ्या खड्ड्यांना कसाबसा चुकवून तो पुढे जात होता. त्यावेळी बजरंग चौकातील रस्त्यावर त्याची दुचाकी घसरली आणि तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी पाठीमागून येणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस (क्रमांक एम एच 40 एन 9507) ही गाडी त्याच्या अंगावरून गेली. यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रशांत याला तीन वर्षांची मुलगी आहे. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या घरातील कर्ता व्यक्ती हरपला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. हा रस्ता मागील दोन वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी इथे अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र. तरिही प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी याकडे लक्ष देताना दिसत नाही.