भंडारा- जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राला १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ६७ केंद्रांपैकी ४८ केंद्र प्रत्यक्षात सुरू झालेली आहेत. यामध्ये आतापर्यंत ४१ हजार १२८ क्विंटल धानाची खरेदी झाली असून १३१९ शेतकऱ्यांनी आपला धान या खरेदी केंद्रावर विकलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी केंद्रावर ज्यास्त धान येणार असल्याची शक्यता जिल्हा मार्केटींग अधिकारी संजय हजारे यांनी वर्तविली आहे.
धानाचे कोठार म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. खरिपाच्या धानाची खरेदी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर सुरू झाली असून यावर्षी साधारण धानाला १८१५ तर, अ ग्रेडच्या धानाला १८३५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार आहे. जिल्ह्यात सात तालुका मिळून ६७ धान खरेदी केंद्र आहेत. यामध्ये भंडारा ३, पवनी ५, मोहाडी ९, तुमसर १५, लाखणी ११, साकोली १२ आणि लाखांदूर येथे १२ खरेदी केंद्र आहेत. या ६७ खरेदी केंद्रापैकी ६० खरेदी केंद्रांचे उद्घाटन झाले असले तरी प्रत्यक्षात ४८ धान खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत. यासाठी १५० गोदामांची व्यवस्था करण्यात आली असून यावर्षी भंडारा आणि पवनी क्षेत्रात अजून गोदाम वाढविण्याची तयारी सुरू आहे.
११ तारखेपर्यंत जिल्ह्यात ४११२८ क्विंटल धानाची खरेदी झाली असून १३१९ शेतकऱ्यांची धानाची विक्री झाली आहे. त्यानुसार ७ कोटी ४६ लाख ४७ हाजार ६३८ रुपये लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मागच्या वर्षी शासकीय धान्य खरेदी केंद्रावर २० लाख क्विंटल धानाची खरेदी झाली होती. या वर्षी खरेदीमध्ये वाढ होऊन खरेदी केंद्रावर ३० लाख क्विंटल धान येणार असल्याची शक्यता जिल्हा मार्केटींग अधिकारी संजय हजारे यांनी वर्तविली आहे.
हेही वाचा- भंडाऱ्यात टोकण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची अजब युक्ती, चपला ठेवल्या रांगेत