भंडारा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी केली. दवडीपार आणि कारधा या दोन गावांना भेट देऊन त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. मात्र, केवळ पाच ते दहा मिनिटे धावती पाहणी करून त्यांनी नेमके काय साध्य केले, अशी चर्चा होत आहे. देवेंद्र फडणवीस येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामुळे सुरक्षित अंतराचा सर्वांना विसर पडल्याचे दिसून आले.
29 ते 31 ऑगस्टपर्यंत तीन दिवसात आलेल्या पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. विशेषता भंडारा तालुका, पवनी तालुका आणि तुमसर तालुक्यामध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. पूर ओसरला असून शासनाने आर्थिक नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. विरोधी पक्ष नेत्यांनीही बुधवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याची योजना आखली. मात्र, एकाच दिवशी नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील गावांना भेट देऊन त्यांनी धावता दौरा केला.
हेही वाचा - ...तर पुरामध्ये एवढे नुकसान झाले नसते, फडणवीसांची सरकारवर टीका
देवेंद्र फडणवीस येणार म्हणून गावकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने त्यांच्यासमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना फारसा वेळ मिळाला नाही. फडणवीस यांनी पाहणी केलेल्या गावात अतिशय वाईट परिस्थिती आहे. जवळपास तीस घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. काही घरे तर जमीनदोस्त झाली असून लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. देवेंद्र फडणवीस आमच्याजवळ येथील आमच्याशी बोलतील, या अपेक्षेने गावकरी वाट पाहत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस आले आणि तसेच निघूनही गेले.
कोणत्याही नेत्यांच्या दौऱ्यांनंतर पूरग्रस्त लोकांच्या समस्या तातडीने सुटत असतील तरच या दौऱ्यांना काही महत्त्व आहे. अन्यथा अशा पद्धतीचे दौरे सध्या कोरोना रुग्णांची वाढ करण्यासाठी पोषक वातावरण निर्मितीचे काम करीत असल्याचे चित्र समोर येत आहे.