भंडारा- जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असून तिसऱ्या अहवाल प्रलंबित आहे. मात्र, तिसराही अहवाल निगेटिव्ह येण्याची पूर्ण शक्यता आहे.
हेही वाचा- केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
45 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे 27 तारखेला समजताच प्रशासन सतर्क झाले. या महिलेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आलेल्या लोकांची यादी तयार करण्यात आली. यात 50 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, यातील सर्वांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले. संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाली कशी याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.
23 तारखेला या महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी तिची कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी ती पाॅझिटिव्ह आढळली होती. 14 दिवसानंतर दुसरा स्वॅब नमुना पाठविण्यात आला. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागातर्फे तिसरा नमुना पाठविला असून वैद्यकीय अहवाल प्रलंबित आहे.
महिलेला कोरोनाची लागण झालीच नाही अशीही एक चर्चा जिल्ह्यातील आरोग्य विभागात सुरू आहे. मात्र, प्रशासन अजूनही यावर भाष्य करीत नाही. त्यामुळे ही गुंतागुंत अजूनच वाढत चालली आहे. प्रशासनाने महिलेला कोरोना झाला कसा या विषयी खुलासा केल्यास नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अजून घट्ट होईल.