भंडारा - जिल्ह्यात रविवार(काल) कोरोना रूग्ण संख्येचा विस्फोट पहायला मिळाला. इतर दिवसांच्या तुलनेत रुग्ण संख्या दुप्पट झाली आहे. रविवारी ४३९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. परिस्थिती बिकट असतानाही नागरीक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी कठोर आणि दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी काही जागरूक नागरिक करत आहे.
रविवारी कोरोनाचा विस्फोट
रविवारी भंडारा जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी समोर आली ती संपूर्ण नागरिकांना हादरवून सोडणारी होती. भंडारा जिल्ह्यात शनिवारी २०० कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. मात्र रविवारी ही संख्या दुप्पट होऊन ४३९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. एकाच दिवशी दुप्पट रुग्णसंख्या आढळल्याने नागरिक हादरून गेले आहेत. असे असले तरी जिल्ह्यात अजूनही बेफिकीरपणे फिणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.
नागरिकांचे आदेशाकडे दुर्लक्ष
होळी साजरी करताना नागरिकांनी साध्या पद्धतीने साजरी करावी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, तोंडाला मास्क बांधावे. असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला होता. मात्र होळीच्या दरम्यान नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. ती पाहता नागरिक अजिबात गंभीर नसल्याचे दिसून आले.
'शासनाने निर्बंध कडक आणि दंडात्मक करावे'
शासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर अतिशय कठोर आणि दंडात्मक कार्यवाही करावी. केवळ भावनिक आदेश काढून चालणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक कारवाई करावी. अशी मागणी जिल्ह्यातील जागरूक नागरिक करीत आहेत.
हेही वाचा-चोपडा येथे पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नसल्याचे अधीक्षकांचे स्पष्टीकरण