भंडारा - गांजाची अवैध वाहतूक करणारा एक कंटेनर भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे. हा कंटेनर ओडिशावरून मध्यप्रदेशच्या दिशेने जात होता. या कंटनेरमधील 24 लाख रुपये किमतीचा 241 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून चार आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले आहे.
राजस्थान पासिंग असलेला एक कंटेनर गांजा घेऊन भंडारामार्गे मध्यप्रदेशच्या दिशेने जात असल्याची माहिती भंडारा कंट्रोल रूमला मिळाली. कंट्रोल रूमने ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला पुरवली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजानन कांकळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने त्वरित कंटेनरचा शोध सुरू केला. हा कंटेनर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गोवा ढाब्याजवळ उभा असल्याचे आढळले. पोलिसांची गाडी दिसतात कंटेनरमधील दोन लोक कंटेनर सोडून पळाले. मात्र, पोलिसांनी मोहम्मद इरफान अब्दुल कदुस (वय 35 वर्ष रा. संभलपूर) याला पाठलाग करून पकडले. दरम्यान, धाब्यावर कंटेनरच्या मागे स्विफ्ट डिझायर ही गाडी आली. कंटेनरच्या जवळ पोलीस दिसल्याने या गाडीतील धनंजय साहू (वय 28 वर्ष रा. बालडी) हा देखील पळून गेला. पोलिसांनी त्यालाही पाठलाग करून पकडले. मात्र, उर्वरित तीन लोकांनी गाडी घेऊन पळ काढला.
पोलिसांनी कंटेनर उघडून तपास केला असता यामध्ये 241 किलो गांजा आढळून आला. या गाजांची किमत 24 लाख 41 हजार एवढी आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून कंटेनरही ताब्यात घेतला आहे. घटनास्थळावरून सहापैकी चार आरोपी पळून गेले असले तरी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे भविष्यात एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांनी व्यक्त केली.