भंडारा - शहरातील प्रसिद्ध खांब तलाव क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे बांधलेले बांधकाम लोकार्पण होण्यापूर्वीच कोसळले आहे. पहिल्याच पावसात या ठिकाणचा चबुतरा पडलाय. तर तलावाच्या संरक्षणासाठी बांधलेली आवर भिंतही काहीच दिवसात कोसळेल, अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे वर्षभरापासून निधी उपलब्ध नसल्याने कंत्राटदाराने हे काम अर्धवट परिस्थिती ठेवले आहे. त्यामुळे ज्या तलावाचे सौंदर्यकरण करण्याची अपेक्षा होती, त्याच तलावाचे आता विद्रुपीकरण झालेले आहे.
जवळपास चार ते पाच कोटी रुपये खर्च करून या खांब तलावाचे सौंदर्यकरण होणार होते. यासाठी तलावाच्या सभोवताल आवार भिंत तयार करण्यात आली. चार ते पाच खोल्या तयार करण्यात आल्या. लोकांना फिरण्यासाठी तलावाच्या सभोवती रॅम्प तयार झाले. तसेच ओपन जिम आणि म्युझिकल कारंजे तयार होणार होती. मात्र निधी नसल्याने कंत्राटदाराचे पैसे थांबले. यामुळे वर्षभरापासून काम पूर्णपणे बंद झाले.
आठवडाभरापूर्वी नागरिकांना सकाळच्या फिरण्यासाठी फक्त एक तास ते उघडण्यात आले. त्यानंतरच निकृष्ट दर्जाचे काम आणि तलावाची झालेली दयनीय अवस्था पुढे आली. 300 वर्ष जुने असलेले हे तलाव शहराची एक ओळख आहे. त्याचे सौंदर्यकरण होत असल्याने नागरिक खूश होते. पर्यटनासाठी शहरात एक जागा उपलब्ध होईल, याचा नागरिकांना आनंद होता. मात्र तलावाचा आजचा विद्रुप चेहरा बघितल्यानंतर त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. हे सौंदर्य करण्याचे काम त शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करावे तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर आणि अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
याविषयी खासदार सुनील मेंढे यांच्याशी ईटीव्ही भारतने संपर्क साधला. या प्रकरणावरर लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात त्यांनी हमी दिली. येणाऱया काळात लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.