भंडारा - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांचा भंडारा जिल्ह्यात नाश्त्याच्या टपऱ्या, पानटपऱ्या, किराणा दुकानांमध्ये पुड्या बांधण्यासाठी उपयोग केला जात असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याची तक्रार सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी विद्यापीठाला केल्यानंतर भंडारा पोलीस ठाण्यामध्ये त्याचा पंचनामा होऊन विद्यापीठाने या उत्तरपत्रिका सध्या ताब्यात घेतल्या आहेत. निष्काळजी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी सिनेट सदस्यांनी केली आहे.
विद्यापीठाच्या बीएस्सी आणि एमएस्सीच्या परीक्षेचे मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांची काही पोती भंडाऱ्यात पोहचली. त्यानंतर पान टपरी आणि किराणा दुकानांमध्ये ही रद्दी म्हणून विकली गेली. उत्तर पत्रिकांचा उपयोग एका टपरीवर ग्राहकांना भजी देण्यासाठी केला जात होता. एका ग्राहकाला ही उत्तरपत्रिका दिसल्यानंतर त्यांनी हा प्रकार सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे आणि माध्यमांच्या समोर आणला. त्यानंतर अशा उत्तर पत्रिका अजून किती प्रमाणात भंडाऱ्यात आहेत? याची चौकशी केली असता काही पोत्यांमध्ये उत्तरपत्रिका आढळून आल्या. याची तक्रार नागपूर विद्यापीठाला केली गेली.
पोलिसात तक्रार देऊन उत्तर पत्रिका घेतल्या ताब्यात
उत्तरपत्रिकांचा आज कोणताही उपयोग नसला तरी यामध्ये असलेल्या काही कोर्या उत्तरपत्रिकांचा दुरुपयोग होऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन केलेल्या उत्तरपत्रिका बेजबाबदार पद्धतीने हाताळल्या जात असतील तर अशा विद्यापीठ कर्मचार्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी केली.
याप्रकरणाची तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर या सर्व उत्तरपत्रिका एकत्रित करून त्या विद्यापीठाला सुपूर्त करण्यात आल्या. या उत्तरपत्रिकांची विल्हेवाट लावण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले होते. वाहतूक करताना कंपनीच्या ट्रकचा अपघात झाल्याने उत्तर पत्रिका पडल्या असाव्यात, असा अंदाज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे व्यक्त केला आहे. हे प्रकरण गंभीर असून याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात येवून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.