भंडारा - पंचवीस वर्षांपूर्वी शहरात बनलेल्या म्हाडा कॉलनीतील लोक नागरी सुविधेच्या प्रतीक्षेत आहेत. या कॉलनीत मागील 25 वर्षांत रस्ते बनले नाहीत. अशाच परिस्थितीत प्रभाग क्रमांक 8 मधील यशोदा नगर आणि भैयाजी नगरातील नागरिक वास्तव्य करत आहेत. नगराध्यक्ष आणि खासदार असलेल्या सुनिल मेंढे यांनी सत्तेचा दुरुपयोग करून या प्रभागातील केवळ त्यांच्या वास्तूंकडे जाणारे रस्ते बनवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शहरात म्हाडाने पंचवीस वर्षांपूर्वी घरं बांधून दिली. त्यावेळेस त्यांनी रस्तेही बांधून दिले. रस्त्यांची कालमर्यादा संपल्यानंतर रस्ते खराब होऊ लागले. हे रस्ते बनवून द्यावे, या मागणीसाठी म्हाडा कॉलनीतील नागरिक शेकडो वेळा नगरपालिकेचे हेलपाटे खात आहेत. मुख्याधिकारी, नगरसेवक यांना नेहमी अर्ज करत आहेत. मात्र, प्रत्येक वेळेस म्हाडाने आपली प्रॉपर्टी नगरपालिकेला प्रत्यर्पण केली नाही, असे सांगून तिथे नागरी सुविधा देऊ शकत नसल्याचे कारण पुढे करत आहेत. त्यामुळे म्हाडानंतर या ठिकाणी कोणीही रस्ते बांधले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
आज या परिसरातील रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. पावसाळ्यात येथे पाण्याची डबकी साचतात. नागरिक सतत जीव धोक्यात घालून वाहतूक करत असतात. म्हाडा हा प्रभाग क्रमांक आठमध्ये येतो. याच प्रभाग क्रमांक आठमध्ये यशोदा नगर आणि भैय्याजी नगर ही येतात. या दोन्ही नगरातील रस्त्यांची परिस्थिती अशीच वाईट आहे. या नगरात नालेदेखील नसल्याने सांडपाणी सर्वत्र जमा होते. रस्त्यांमुळे जीव धोक्यात आणि सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात असल्याचे येथील नागरिक सांगतात.
आम्ही वारंवार विनंती करूनही नगरसेवकांनी रस्ते बनवले नाही. मात्र, याच म्हाडा कॉलनीतून सुनील मेंढे यांची शाळा आणि त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे जाणारा रस्ता त्यांनी बनवला आहे. तेव्हा प्रत्यर्पणाचे नियम कुठे होते, असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत. सुनील मेंढे केवळ आपल्या स्वार्थापोटी आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. नगराध्यक्षांना याविषयी विचारल्यानंतर प्रत्यर्पणाची प्रक्रिया झाल्याशिवाय तुमच्या प्रभागात रस्ते आणि नाले बांधता येणार नसल्याची उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. भंडारा शहरात म्हाडा, यशोदा, भैय्याजी नगर सारखे बऱ्याच भागात रस्ते अतिशय वाईट आहेत.