भंडारा - कामगार सुरक्षा किट वाटप कार्यक्रमात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपचे आमदार चरण वाघमारे यांच्यासह शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांविरोधात 18 तारखेला तुमसर येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद झाल्याचे कळताच आमदार चरण वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसोबत तुमसर पोलीस ठाण्यात पोहोचून अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्याला घेराव घालून तणाव निर्माण केला होता. पुढील पाच दिवसात चौकशी केल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
यानंतर शनिवारी सकाळी भंडारा पोलिसांनी वाघमारे यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. आमदारांना अटक झाल्याची माहिती मिळताच भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी खासदारांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचले. चरण वाघमारे यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या आमदारावर महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर ही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.