भंडारा - भंडारा आणि नागपुरातील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करून विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन चोरांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सौरभ कैलास बांते वय (22) आणि गुरुदेव भोलाराम राखडे वय (26 ) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारेही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील वरठी, कारधा परिसरात तसेच नागपूरातील बजाज नगर, पाचपावली परिसरात या चोरांनी अनेक दुचाकी चोरी केल्या. यामध्ये बजाज पल्सर, होंडा अक्टिव्हा, बजाज एवेंजर, होंडा स्प्लेंडर या मोटरसायकलचा समावेश आहे. या चोरी केलेल्या गाड्यांवर खोटी नंबर प्लेट लावून ते विकण्याचा प्रयत्नात ते होते.
हेही वाचा - मोटारसायकल चोर सीसीटीव्हीत कैद.....
दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. यावेळी एक होंडा सी बी गाडी चोरी करीत असतांना पोलिसांना आढळले. पोलिसांना पाहील्यावर त्यांनी गाडी तिथेच सोडून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत दोघांनाही अटक केली. तपासादरम्यान आरोपींच्या घरी छापा टाकण्यात आला. तिथे पोलिसांना अनेक गाड्या आढळुन आल्या असुन सर्व गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.