भंडारा - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी आरोपी लोकसेवक लोकेशकुमार उर्फ बाळू नामदेव ठोंबरे (वय 38 वर्षे), कनिष्ठ लिपिक उपविभागीय अधिकारी कार्यालय तुमसर, याला तक्रारदाराकडून 15000 रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दाखविल्याने अटक केली आहे. वाळूचे ट्रक सोडविण्यासाठी लाच मागितली होती.
तक्रारदार याच्या मालकीचा ट्रक मोहाडी तहसीलदार यांनी पकडला होता. या ट्रकमध्ये अवैध 5 ब्रास रेती होती. त्या संबंधाने तक्रारदार यांचेकडून दंडाची रक्कम जमा करण्यात आली होती. या कारवाईनंतर तक्रारदार यांचेकडून 15 लाख रुपये रकमेचे बंधपत्र घेण्यात आले. बंधपत्रातील 15 लाखांची रक्कम मी कमी करून देतो. माझी या उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी चांगले संबंध आहेत, या विभागात केवळ मी म्हणतो त्या पद्धतीने अधिकारी कामे करतात. त्यामुळे तुम्हाला जर ही रक्कम कमी करायची असल्यास सांगा, असे आरोपी ठोंबरे यांनी सांगितले. मात्र, या मोबदल्यात १५ हजार रुपये लाचेची मागणी त्यांनी केली. तक्रारदाराने विषयीची तक्रार लाचलुचपत विभागाला दिली. त्यानंतर लाच लुचपत विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे तक्रारदार हा आरोपीकडे बोलणी करण्यासाठी गेला तेव्हा 15 लाखांची बंधपत्रातील रक्कम कमी करून देण्यासाठी 50 हजार वरून तडजोड करून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी आरोपीने दाखविली.
आरोपीने मागितलेली लाचेची मागणी झाली आहे किंवा नाही याची शहानिशा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 11/08/2020 आणि 13/08/2020 ला केलेली आणि काल दिनांक 14/08/2020 ला गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी या विभागात बऱ्याच वर्ष्यापासून कार्यरत आहे. या उपविभागीय कार्यालयाच्या क्षेत्रात तुमसर आणि मोहाडी हे दोन तहसील आहेत. आरोपी लोकांकडून नेहमीच लाच घेतो, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, आज पर्यंत त्याच्या विरुद्ध कोणी तक्रार करत नसल्याने त्याचे चांगलेच फावले.
हीत्रकार्यवाही पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर ला.प्र.वि. नागपूर, महेश चाटे उपविभागीय पोलीस अधिकारी ला. प्र. वि. भंडारा यांचे मार्गदर्शनात करण्यात आली आहे. योगेश्वर पारधी पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. भंडारा हे या प्रकरणाचा तपास करत असून सफौ. गणेश पडवार, पोहवा. रविंद्र गभणे, पोना. अश्विन गोस्वामी, पराग राऊत यांनी केली आहे.