भंडारा - कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात भंडारा पोलिस मोठ्या खंबीरपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. लोकांनी घरी राहावे, सुरक्षित राहावे असा संदेश देत लॉकडाऊनच्या काळात ड्रोनद्वारे भंडारा शहर आणि नागरिकांपर्यंत पोहचण्याचे काम करत आहेत.
भंडारा शहरातील लोकांनी असा भंडारा या अगोदर कधीही बघितला नसेल, असे मोहक दृश्य या ड्रोनमधून दिसत आहेत. दृष्यांमध्ये रस्ते निर्मनुष्य आहेत. शहरातील गजबजलेले सर्व चौक निर्मनुष्य दिसत आहेत. हे दृश्य पाहताना बरेच वेळा हा आपलाच भंडारा आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. केवळ काही लोक रस्त्यांवर दिसत आहेत. शेवटी पोलिसांचे लाँग मार्च दाखवले आहे आणि घरीच राहा स्वतःला आणि दुसऱ्यांनासुद्धा सुरक्षित ठेवा, असा संदेशही दिला जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात लोक नियमांचे पालन न करता घराबाहेर पडत होते. मात्र, असे असले तरी भंडारा जिल्ह्यात पोलीस विरुद्ध नागरिक अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. किंबहुना पोलीस अधीक्षकांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ती परिस्थिती व्यवस्थित हाताळली. समज देऊनही न एकणाऱ्या 4500 लोकांवर कार्यवाहीसुद्धा केली. तर, प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यामुळे लॉकडाऊन योग्य पद्धतीने पडल्या गेला आणि त्याचा फायदा म्हणजे भंडारा जिल्ह्यात अजूनतरी कोरोनाचा एकही रुग्ण नाही, याचा एक समाधान जिल्हावासियांना आहे.