भंडारा - ग्रीन झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्हयात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. अशा परिस्थितीत कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजीवन विस्कळीत होणार नाही, याची काळजी घेऊन जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हाबंदी असल्याने आडमार्गाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी जिल्हयातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती हेही उपस्थित होते. कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठीच्या उपाययोजने अंतर्गत खाजगी डॉक्टर्स असोसिएशनची बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आरोग्य यंत्रणेने पीपीई, मास्क, सॅनिटायझरचा मुबलक पुरवठा ठेवावा.
कोविड सेंटरमध्ये सर्व स्टाफची उपस्थिती आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावर जीवनावश्यक वस्तुंची मालवाहतूक करतांना दुकानदार खाजगी वाहनातून मालवाहतूक करताना आढळले आहेत. आता मालवाहतूक करताना दुकानदारांनी परवानाधारक माल वाहतूक वाहनामधूनच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. वयोवृध्द व दिव्यांगाना सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. किराणा असोशिएशनची बैठक घेवून त्याबाबत माहिती देण्यात यावी. तसेच औषध विक्रेत्यांची तहसिलदारांनी बैठक घेऊन औषधांचा तुटवडा भासणार नाही याबाबत त्यांना अवगत करावे, असे ते म्हणाले.
मुस्लीम धर्मियांच्या रमजान सणाबाबत योग्य नियोजन करावे, नमाज पठण घरातच करण्यात यावे. रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई असल्याचे, त्यांनी सांगितले. जिल्हा बंदी असूनही भंडारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील लोक प्रवेश कसे करतात, या पुढे केवळ मुख्य सीमेवर नाही तर विविध आडमार्ग शोधून त्यांनाही पूर्णपणे सील करण्यात यावे आणि अशा मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.