भंडारा - जिल्हात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांची रस्त्यावर गर्दी होत आहे. लोकांची जनजागृती करण्याच्या उद्देशाने भंडारा पोलीस आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱयांनी एकत्र रूटमार्च काढला. प्रत्येक चौकात, बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर फिरताना नागरिकांनी आदेशांचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली, जाईल अशा इशारा पोलिसांतर्फे देण्यात आला.
तीन जूननंतर शासनातर्फे मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. सोबतच काही नियम आणि अटी नागरिक व व्यापाऱ्यांसाठी घालण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात व्यापारी आणि नागरिक या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी व्यापारी व नागरिकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. मात्र तरीही नागरिक नियमांना कचऱ्याची टोपली दाखवत आहे. या सर्व निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे म्हणून पोलीस आणि नगर परिषदेने जनजागृतीसाठी रूटमार्च काढला.
नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, बाजारपेठ, मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टिन्सिंग ठेवावे आणि इतर नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना या रूटमार्च दरम्यान देण्यात आल्या.
शास्त्री चौकापासून या रूट मार्चला सुरुवात झाली त्यानंतर गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, पोस्ट ऑफिस चौक, मुस्लीम लायब्ररी, राजीव गांधी चौक, खांब तलाव चौक मार्गे संचलन करण्यात आले. यामध्ये भंडारा पोलीस दलाचे 28 कर्मचारी, आसीपीचे 25, वाहतूक नियंत्रण विभागाचे 2 आणि नगर परिषदेचे 25 अशा एकूण 87 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.