भंडारा - लॉकडाउनच्या काळात प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही नागरिक नाहक रस्त्यांवर फिरत असतात. यामुळे पोलीस आणि नागरिकांमध्ये वाढता ताण लक्षात घेता आणि रस्त्यावरिल गर्दी कमी करण्यासाठी भंडारा नगरपरिषदद्वारे प्रत्येक कुटुंबाला पास देण्याचे ठरविले आहे. यामुळे निर्धारित तारखेला भंडारा शहरवासियांना अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडता येणार आहे.
भंडारा नगरपरिषदेने दिल्लीच्या धरतीवर सम-विषम (ऑड-ईव्हन) पासेस पर्याय शोधून काढले आहेत. शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबाला ही सम-विषम कार्ड मिळणार आहेत. 30 कर्मचारी 2 दिवसात 25 हजार पासेसचे वाटप करणार आहेत. पास वितरित करताना कुटुंबातील महिलेला प्राध्यान्य देण्यात येणार आहे. या पासमध्ये पासधारकाचे नाव, कुटुंब सदस्य संख्या, पत्ता आणि फोटो असणार आहे. कार्डवर फोटो लावलेल्या व्यक्तीलाच घराबाहेर निघता येणार आहे. घरून निघताना बाहेर निघण्याचे कारण त्यावर नमूद करायचे असून दुकानदाराची स्वाक्षरीसुद्धा लागणार आहे. सोबत पास नसणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भंडारा जिल्ह्यात संचारबंदीसह कलम 144 लागू करण्यात आले असून कुणीही घराबाहेर निघू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. पोलिसांनी किती सांगितले तरी लोक जीवनावश्यक वस्तू घेण्याच्या नावाखाली एक पिशवी घेऊन शहरात फिरत असतात. आता या प्रकाराला नगर परिषदचे कार्ड मिळाल्यानंतर नक्कीच बंधन घालता येतील. त्यामुळे, कोरोना प्रादुर्भाव थांबविण्यास मदत होईल आणि पोलीस आणि नागरिकांमधील संघर्ष टाळता येईल.