भंडारा - सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार 2 मे 2021 पर्यंत भंडारा जिल्ह्याची रुग्णसंख्या 41 हजार 740 एवढी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तेव्हा जिल्ह्याला 13 हजार 500 आयसोलेशन खाटां, 4680 ऑक्सिजन खाटा, आयसीयुमध्ये 1048 खाटा तर 310 वेंटिलेटरची कमतरता भासेल, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. याविषयी पालकमंत्री विश्वजीत कदम यांना विचारले असता हा अहवाल कोणाचा आहे? तो मी बघितला नाही त्यामुळे याच्यावर मी भाष्य करणार नाही. मात्र भंडारा जिल्ह्यात भविष्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हानी होऊ शकते. हे विचार करून आरोग्य यंत्रणेला लागणारी सर्व गोष्टींची उभारणी केल्या जाईल, त्यासाठी लागणारा सर्व खर्च जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासनातर्फे केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
'जिल्ह्यात फक्त 120 रेमडेसिवीर इंजेक्शन'
जिल्हात 12 एप्रिल पासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. 12 तारखेला नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना मी कंपनीच्या मालकाशी बोललो आहे. लवकरच हजार इंजेक्शन येतील असे पटोले यांनी सांगितले होते. त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. याविषयी बोलताना पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले की, इंजेक्शनची डिमांड मोठ्या प्रमाणात असून दररोज होणारा पुरवठा लगेच संपत आहे. जिल्ह्यात सध्या 120 रेमडेसिवीर इंजेक्शन आहेत आणि याचा तुटवडा पडू देणार नाही. लवकरच आवश्यकतेनुसार उपलब्धता करणार असून याविषयी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. शिवाय विभागीय आयुक्तांना साठा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
'गर्दी विषयी अधिकाऱ्यांना सांगून कार्यवाही करू'
शासनाने ठरवून दिलेल्या नवीन नियमानुसार बुधवारी सकाळी 7 ते 11 दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू झाले. मात्र, या दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडालेला पहायला मिळाला होता. याविषयी पालकमंत्र्यांना विचारले असता नागरिकांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळाणे आवश्यक आहे. जर नागरिक ऐकत नसेल तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सांगून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
'आरोग्य यंत्रणेचा उपचारावर भर'
सध्या संचारबंदी लागल्याने आणि कळक निर्बंधांमुळे नवीन रुग्णसंख्या आटोक्यात येत असून सध्या जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत आणि ज्यांना उपचारांची गरज आहे. अशा रुग्णांच्या उपचारावर आरोग्य यंत्रणा भर देत आहे. रुग्णांचा जीव वाचवणे हे आता प्राथमिकता झाली आहे, असेही विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-पुण्यात रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातलगांनी केली डॉक्टरांना मारहाण, रुग्णालयाची तोडफोड