भंडारा - नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे म्हटले जाते. दिलेल्या उद्दिष्टाच्या १३२ टक्के नेत्रदान करून भंडारा जिल्ह्यातील लोक नागपूर विभागात अव्वल ठरले आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये उद्दिष्टापेक्षा २४० टक्के शस्त्रक्रिया करून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात अव्वल ठरले आहे. चार वर्षापासून हे रुग्णालय मोतीबिंदू शस्त्रक्रियेत राज्यात प्रथम येत आहे.
राष्ट्रीय अंधत्व निवारण व दृष्टिहीनता कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे विविध उपक्रम राबवते. जिल्ह्यामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर नेत्र पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. पंधरा दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत अशा विविध ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम करून जास्तीत जास्त लोकांना नेत्रदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. नेत्र समुपदेशक सोनाली लांबट नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देतात.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाने नेत्रदान चळवळीसाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा शक्य तेवढे नेत्रदानाचे कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने नेत्र विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने नेत्रदान चळवळीला पोषक असे वातावरण निर्माण केले. 2018 -19 या वर्षात जिल्ह्याला 40 नेत्र बुबुळे जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न न करता जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदानाचे करावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्याची फलश्रुती ही त्यांना मिळाली. शासनाच्या 40 उद्दिष्टापेक्षा कितीतरी जास्त उद्दिष्ट पूर्ण करत 53 नेत्र बुबुळे संकलन त्यांनी केले. त्यांनी 132 टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत नागपूर विभागात भंडारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जगात अंधांची संख्या पाच कोटीच्या पुढे आहे. एक कोटी 30 लाख अंध भारतात आहेत. त्यातही वीस लाख बालकांची संख्या आहे. पारदर्शक असणाऱ्या डोळ्यांचे बुबुळ जीवनसत्व अ च्या अभावामुळे डोळे येण्यामुळे इजा होण्यामुळे किंवा आजाराने अपारदर्शक होऊन अंधत्व येते. दृष्टिदान मिळावे यासाठी देशात प्रतीक्षा करावी लागते. त्यासाठीच संपूर्ण देशात नेत्रदानाची चळवळ व्यापक प्रमाणात राबविली जाऊन या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नेत्रदान याप्रमाणे मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्ये उद्दिष्टाच्या 198 टक्के नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2014 पासून दुप्पट मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात आहे. त्यामूळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मध्ये भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय पाच वर्षापासून राज्यात प्रथम येत आहे. याचे श्रेय नेत्र विभागातील डॉक्टर, कर्मचारी तसेच वरिष्ठांना ही जाते त्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसल्याचे जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक यांनी सांगितले.