भंडारा - जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येमध्ये अतोनात वाढ झाली आहे. अतिशय गंभीर बाब म्हणजे या मृतांमध्ये 72 तासाच्या आत मरणाऱ्या लोकांची संख्या अतिशय जास्त आहे. ज्या नागरिकांनी उपचार न करता आजार अंगावर काढला आणि शेवटी उपचारसाठी रुग्णालयात दाखल झाले अशाच लोकांचा 72 तासांच्या आत मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोना पासून वाचायचे असल्यास कोरोना सारखी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्या, असे आव्हान जिल्हाधिकारी आणि डॉक्टर यांनी नागरिकांना केले.
अंगावर आजार काढला तर जीवावर बेतेल, जिल्ह्यत 72 तासात मरणाऱ्यांची संख्या सर्वात ज्यास्त 22 सप्टेंबरला भंडारा जिल्ह्यात 205 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 4101 झाली असून त्यापैकी 2611 लोक बरे सुद्धा झाले आहेत. तर 1402 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तसेच 88 लोकांचे आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. या 88 पैकी 65 जणांचा या सप्टेंबर महिन्यात बावीस दिवसात मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 57 लोकांचा मृत्यू हा अवघ्या 72 तासाच्या आत झालेला आहे. यापैकी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताच 24 तासाच्या आत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 32 आहे. तर 48 तासाच्या आत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 15 आहे. काही रुग्णांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल करताच काहीच वेळात झाला आहे. या वरून हे स्पष्ट दिसते की नागरिक सिरियस झाल्यावर उपचारसाठी येतात. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे त्यांना वाचविणे शक्य होत नाही.नागरिक कोरोनाला घाबरून कोरोनाची चाचणी करत नसल्याचे बरेचदा पुढे येत आहे. मात्र, प्रत्यक्षात तुम्हाला लक्षणे आढळतात किवा मनात थोडीशी शंका असताना जर तुम्ही कोरोनाची चाचणी केली आणि तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर तुम्हाला लवकर उपचार मिळतील आणि ज्या नागरिकांना लवकर उपचार मिळाले ते प्रत्येक नागरिक बरे झालेले आहेत. मात्र, जे नागरिक मुद्दाम कोरोनाची टेस्ट करत नाहीत आणि चार-पाच दिवस घरीच वाटेल तसा उपचार करतात, अशा लोकांना शेवटी श्वास घ्यायला त्रास होतो आणि तेव्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. मात्र, तोपर्यंत परिस्थिती अतिशय गंभीर होऊन या रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे या रुग्णांचे प्राण तर जातात. मात्र, घरी राहण्याच्या त्याच कालावधीमध्ये हे रुग्ण इतरही नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार करतात.
प्रत्येक नागरिकांनी कोरोनासारखे लक्षणे दिसताच शक्य तेवढ्या लवकर कोरोनाची टेस्ट करावी. ज्यामुळे तुमचा जीव वाचेल आणि कोरोनाचा समाजात होणारा प्रादुर्भाव थांबू शकेल. आजार अंगावर काढाल तर तुमच्या जीवावर बेतेल. त्यामुळे आजार अंगावर काढू नये, अशी विनंती जिल्हाधिकारी आणि डॉक्टरांनी नागरिकांना केली आहे.