भंडारा - नागरिकांच्या मृत्यूनंतर त्यांना पैसे वाटत बसण्यापेक्षा त्यांचा मृत्यू होऊ नये याची काळजी घ्या. घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग का येते तोपर्यंत प्रशासन झोपलेले असते का? असे थेट प्रश्न मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केले आहे. गुरुवारी ते भांडरा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आले असता ते माध्यमांसमोर बोलत होते.
ही घटना म्हणजे प्रशासन आणि शासनाचा निष्काळजीपणा -
भंडारा जिल्ह्यात शुक्रवारच्या मध्यरात्री झालेल्या दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्वच पक्षातील राजकीय नेते जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. याच पद्धतीने मनसे नेते बाळा नांदगावकर हे सुद्धा गुरुवारी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचले. त्यांनी सुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करून घटनास्थळाला भेट दिली. कोणतेही नवीन रुग्णालय किंवा व्यवस्था उभी करताना बी सर्टिफिकेट ची आवश्यकता असते. यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणापासून अन्य सुरक्षेच्या सोयी-सुविधांची उपलब्ध असल्याचे नमूद असते. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी काही बाबतीत संवाद साधला मात्र ते कारण उत्तरे देऊ शकले नाहीत. ही जिल्हा प्रशासन आणि शासन लोकांच्या निष्काळजीपणा मुळे झालेली घटना आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
घटना घडल्यानंतरच का जाग येते, पहिले झोपले असतात का -
प्रत्येक वेळेस घटना घडल्यानंतरच शासनकर्त्यांना जाग येते आणि त्यानंतर त्या घटनेशी संबंधित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौकशी अहवाल, तपासणी असे प्रकार सुरू होतात. प्रत्येक वेळेस घटना घडण्याची का वाट पाहिली जाते? जे नियम पायदळी तुळवतात अशा लोकांवर सुरवातीलाच कारवाई का केली जात नाही. घटना घडल्यावर शासनाला का जाग येते तोपर्यंत हे काय झोपलेले असतात का असे विविध प्रश्न या वेळी बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केले आहेत.
नागरिक मरण्याची वाट तुम्ही का पाहता?
नागरिकांचा जीव स्वस्त आहे का प्रत्येक वेळेस त्यांच्या मृत्यूनंतर प्रशासन त्यांच्या कुटुंबियांना पैसे देऊन सांत्वन करतो. कुठल्याही कुटुंबाच्या व्यक्तींना पैसे नको आहेत, त्यांना कुटुंबातील व्यक्ती हवी आहे. त्यामुळे मृत्यू नंतर पैसे वाटप करण्यापेक्षा नागरिकांचा अशा घटनांनी बळी जाणार नाही याची दक्षता शासन का घेत नाही असा प्रश्नही या वेळी बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला.