भंडारा - कोरनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे नियोजित सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. बाबासाहेबांच्या अनुयायांनी आपल्या घरी राहूनच जयंती साजरी करावी, अशी विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष आणि भंडारा पोलिसांनी केली आहे.
दरवर्षी 14 एप्रिलला संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचे आणि रॅलीचे आयोजन केले जाते. मात्र, या वर्षी कोरोनासारख्या आजाराने संपूर्ण देश हादरले आहे. हा विषाणूचा एकमेकांच्या संपर्कात आल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा फैलाव होतो म्हणून एकत्र न येताचे जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. म्हणूनच लोकांनी जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित येऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समाजातील लोकांना जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करावी. फटाके फोडू नये आणि घरा बाहेर पडू नये, असे आवाहन समिती अध्यक्षांनी समाज बांधवांना केले आहे.
फक्त कार्यक्रमच नाही तर कोणीही विहारात जाऊन सामूहिक पूजा करू नये. देशावर आलेल्या या कोरोना नावाच्या संकटाला देशातून परतवून लावण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.