भंडारा - नामनिर्दशन अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी भाजप, राष्ट्रवादी, बहुजन समाज पक्ष यांच्यातर्फे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीतर्फे मोठ्या रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले गेले. आज २५ तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपतर्फे अधिकृत उमेदवार सुनील मेंढे यांनी उमेदवारी अर्ज भरला.
मागील १५ दिवसांपासून भंडारा मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल, यासाठी पक्षांमध्ये मोठी खलबते सुरू होती. मात्र, यामध्ये बाजी मारली ती भंडारा नगर परिषद नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी. काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपने मोठी शक्तिप्रदर्शन रॅली काढली. शास्त्री चौकापासून निघालेल्या या रॅलीमध्ये दोन्ही जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडाराचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशीवार, आमदार विजय रहांगडाले, आमदार रामचंद्र अवसरे हे सर्व या रॅलीमध्ये उपस्थित होते.
जवळपास १० ते १५ हजार लोकांच्या या रॅलीत सहभागी झाले होते. शास्त्री चौकातून निघालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाली. या निवडणुकीत आम्ही १०० टक्के जिंकू, असा विश्वास भंडारा-गोंदिया लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांनी दाखविला.