बुलडाणा - खूनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा झालेला सुभाष रामदास गवई हा अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता. यादरम्यान तो पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झाला. यानंतर पोलिसांनी त्याचा बराच शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर तब्बल पंधरा वर्षांनंतर त्याला मुंबईतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई जळगाव जामोद पोलिसांनी केली.
गवई (वय-51 वर्ष) 2004 मध्ये अमरावती कारागृहातून संचित रजेवर बाहेर आला होता. यानंतर तो फरार झाला. त्याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलिसात कलम 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गवई नवी मुंबई येथे राहत असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना मिळाली. यानंतर सायबर विभागाची मदत घेत पोलिसांनी गुन्हेगार सुभाष गवईला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. यानंतर त्याची बुलडाणा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.