भंडारा - कोरोना नियमांची पायमल्ली करत मोठ्या संख्येने लोकांना बोलावून लग्न सोहळा साजरा करने एका आयोजकाला चांगलेच महागात पडले. या आयोजकावर भंडारा तहसीलदार अक्षय पोयाम यांनी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावत तो वसूलही केला आहे. भंडारा शहरालगत ठाणा गावातील बावनकुळे सभागृहात हा प्रकार घडला.
हेही वाचा - भंडारा येथे भाजपाचे रास्ता रोको आंदोलन; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
केवळ 100 लोकांची होती परवानगी
महाराष्ट्र शासनाने 7 जूनपासून कोरोनाच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली. त्यासाठी त्याची पाच टप्प्यांत वर्गवारी करण्यात आली. तेव्हा भंडारा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी साडेसात टक्क्यांवर असल्याने भंडाराला तिसऱ्या टप्प्यामध्ये समायोजित केले गेले. त्यानंतर कोरोनाबाधितांची टक्केवारी पाच टक्क्यांच्या खाली आल्याने 14 जूनपासून भंडारा हा प्रथम वर्गात आल्याने नियम अजून शिथिल करण्यात आली आणि त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील लग्नसमारंभासाठी 100 लोकांना परवानगी देण्यात आली.
150 लोकांपेक्षा जास्त होती संख्या
कोरोनाच्या नियमानुसार केवळ शंभर लोकांची परवानगी असताना भंडारा तालुक्यातील ठाणा गावात असलेल्या बावनकुळे सभागृहात सुरू असलेल्या विवाहाच्या ठिकाणी जवळ जवळ 150 च्या वर लोकं उपस्थित होते. एवढेच नाही तर, कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी राठोड, तहसीलदार अक्षय पोयाम आपल्या चमूसह सभागृहात पोहचले, तेव्हा त्यांना मिळालेली माहिती खरी ठरली. लग्नात कोणीही मास्क घातलेले नव्हते, मात्र अधिकारी पोहचताच नागरिकांनी मास्क घालायला सुरवात केली. काहींनी तर मास्क नसल्याने रुमाल बांधून खानापूर्ती केली. तहसीलदार पोयाम यांनी 10 हजारचा दंड ठोठावला आहे आणि परत असा प्रकार घडल्यास सभागृह सील करण्याची तंबीही सभागृह मालकास देण्यात आली.
कोरोना थांबेल तरी कसा
शासनाने कोरोनाचे नियम पाळून दिले असले तरी नागरिक या नियमांकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे, कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. लोकांनी नियम पाळले नाही तर कोरोनाला देशातून हद्दपार कसे करता येईल, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
हेही वाचा - भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, आढळला केवळ एक रुग्ण