भंडारा- विदर्भात मावा (खर्रा) मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. या पदार्थाची लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत सर्वांनाच चटक लागली आहे. परंतु, माणसाप्रमाणे प्राण्यालाही खर्रा खाण्याची सवय लागल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील एका बोकडाला चक्क खर्रा खाण्याची विचित्र सवय जडली आहे. बोकडाला खर्रा खाताना पाहून लोकांना त्याच्याविषयी आश्चर्य वाटत आहे.
जिल्ह्यातील मोहगाव देवी गावातील अशोक उपारीकर हे पान टपरी चालवितात. त्याचबरोबर, ते शेळी पालनाचासुद्धा व्यवसाय करतात. उपारीकर यांच्याकडील बोकड हा माणसाप्रमाणे चक्क खर्रा खातो. हा बोकड मावा खाण्याकरिता इतर ग्राहकांप्रमाणे पानटपरीवर येत असतो व आपल्या मालकाला खर्रा मागतो. एवढेच नव्हे तर, ज्या व्यक्तीकडे खर्रा दिसेल त्या व्यक्तीकडे हा बोकड खर्रा मागतो. खर्रा असूनसुद्धा जर कोणी बोकड्याला खर्रा दिला नाही तर, तो त्यांना मारायलासुद्धा धावतो. त्यामुळे गावातील खर्रा शौकीन या बोकड्यासमोर कधीही खर्रा काढत नाही.
लहान वयातच लागली सवय
बोकड्याला लहान वयातच खर्रा खायची सवळ लागल्याचे अशोक उपारीकर यांनी सांगितले. त्यांचा बोकड लहान असताना मोकाट असायचा. तो टपरीवर यायचा व अर्धवट खाऊन फेकलेल्या पॉलिथीनमधील खर्रा खायचा. त्यामुळे, हळूहळू त्याला खर्रा खाण्याची सवय लागली. आता हा बोकड ६ महिन्याचा असून तो खर्र्याच्या एवढा अधीन गेला आहे की, त्याला चारा खात असताना कोणी खर्रा खाणारा दिसली की, तो चारा सोडून देतो व खर्र्यावर तुटून पडतो. दर दिवसाला त्याला दोन खर्र्याच्या पुढ्या लागतात. दरम्यान, विचित्र सवय लागलेला हा बोकड परिसरात सर्वांच्या आश्चर्याचा विषय बनला आहे.
हेही वाचा- जनतेचे किती पैसे खड्ड्यात घातले भंडारावासियांचा सवाल, अधिकाऱ्यांचे मौन