भंडारा- जिल्ह्यात परदेशातून आलेल्या ११ नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले होते. मात्र, सामाजिक जबाबदारी न पाळता यातील ६ जण घराबाहेर फिरत होते, त्यामुळे आज आरोग्य विभागाने या ६ जणांवर कारवाई करत शहरातील शासकीय नरसिंग शाळेत विलगीकरणासाठी ठेवले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ११ लोक विदेशातून आले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने या लोकांना आप आपल्या घरी राहण्यास सांगितले होते. परुंतु, आरोग्य विभागाच्या आदेशाचे पालन न करता ११ पैकी ६ नागरिक शहरात फिरत होते. याबाबत त्यांना आरोग्य विभागाकडून चेतावनी देखील देण्यात आली होती. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे, आज आरोग्य विभागाने या ६ जणांवर कारवाई करत त्यांना शहरातील शासकीय नरसिंग शाळेत विलगीकरणासाठी ठेवले आहे. जोपर्यंत हे नागरिक धोक्याबाहेर असल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत त्यांना नरसिंग शाळेतच ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकाने सांगितले आहे.
हेही वाचा- वैनगंगा नदीत अज्ञात व्यक्तीची आत्महत्या; ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान