भंडारा- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्याच्या सातही तालुक्यातील ८९८ गावांपैकी ४५४ गावे बाधित झाले असल्याचा कृषी अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये ८०८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १० हजार ५२९ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पंचनामे अजून पूर्ण झाले नसून या सगळ्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभाग, तहसील विभाग आणि त्रिसदस्यीय समितीने केलेल्या पंचनाम्यात वेगवेगळे आकडे आलेले आहेत. आणि अजूनही पंचनामे सुरू असल्याने या सर्व आकड्यात बदल होणार आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार भंडारा तालुक्यामध्ये १४१ गाव, पवनी तालुक्यामध्ये ६२ गावे, मोहाडी तालुक्यामध्ये १२ गावे, साकोली तालुक्यामध्ये ६७ गावे, लाखणी तालुक्यामध्ये ९४ गावे आणि लाखांदूर तालुक्यामध्ये ६३ गावे बाधित झालेली आहेत.
तहसीलदार यांच्या अहवालानुसार १० हजार ५२९ शेतकऱ्यांचे पीक या पावसामुळे खराब झाले आहेत. तर, त्रिसमितीच्या सदस्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पंचनाम्यानुसार एकूण ९ हजार ४४३ शेतकरी बाधित झाले असून त्यात ३० टक्क्यांच्या आत ३३०५ शेतकरी आणि ३० टक्क्यांच्या वर ६१३८ शेतकरी बाधित झालेले आहेत. अजूनही १४८० शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करणे बाकी असल्याने या आकडेवारीमध्ये बदल होणार आहे. भंडारा जिल्ह्यात मुख्यत्वे धानाची शेती केली जाते. त्यामुळे, परतीच्या पावसात धानाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी विम्याची आणि शासनातर्फे मिळणाऱ्या नुकसानभरपाईची प्रतिक्षा करीत आहे.
हेही वाचा- भंडारा वाहतूक शाखेत अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहने दाखल