भंडारा - दिवाळी निमित्त भंडारा आणि गोंदियावरून 44 जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व गाड्या 12 नोव्हेंबर पासून सोडल्या जाणार आहेत. यामध्ये साधारण, निमआराम, शिवशाही अशा बस गाड्यांचा समावेश आहे. या जादा गाड्यांमुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
12 नोव्हेंबर पासून सोडल्या जाणार जादा बस
राज्य परिवहन महामंडळामार्फत साधारण, लांबपल्ला, मध्यम लांबपल्ला, शिवशाही, निमआराम व अंतरराज्य फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 44 जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. या बसच्या फेऱ्या गुरुवारपासून सुरू होतील.
भंडारा आणि गोंदिया आगारातून सोडल्या जाणार बस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून बससेवा बंद होती. मात्र अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये राज्यात आता बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या नियम व अटींमध्ये राहून भंडारा विभागातून देखील बस सेवेला प्रारंभ झाला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी भंडारा आगारातून बस सुटतात. आणि आता दिवाळीच्या सणानिमित्त भंडारा आणि गोंदिया आगारातून जादा बस सोडण्यात येणार असल्याने, प्रवाशांची सोय झाली आहे.