भंडारा - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या असून आत्तापर्यंत 31 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 8 एप्रिल 2020 पर्यंत 76 व्यक्तींचे घशातील नमुने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो), नागपूर येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 38 व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, 11 व्यक्ती अलगीकरण कक्षात आहेत.
1 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान मुंबई, पुणे व इतर राज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या 17 हजार 898 आहे. यापैकी 875 व्यक्तींचा 28 दिवसांचा गृह विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. तर, 1 हजार 723 व्यक्तींना गृह विलगीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत.
भंडारा जिल्ह्यामध्ये आजपावेतो एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. तरीसुद्धा शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यामधील 9 शासकीय वसतिगृहांमध्ये विस्थापित तसेच मजूर, कामगार यांच्यासाठी निवारागृह तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी भोजन, वैद्यकीय तपासणी, योग व समुपदेशनाची व्यवस्था आहे.
जिल्हाधिकारी एमजे रविचंद्रन यांच्या नेतृत्त्वात जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना आखत असून वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून जीवनावश्यक व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.