भंडारा - जिल्ह्यात गेल्या २४ तासात झालेल्या जोरदार पावसामुळे ३ वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. लाखांदूर, पवनी आणि मोहाडी तालुक्यात घडलेल्या या तिनही घटनेत ३ जण मृत तर २ जण गंभीर जखमी झाले, ५ जनावरे पाण्यात वाहून गेली. लाखांदूर आणि पवनी तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पवनी तालुक्यात ४२ आणि लाखांदूर तालुक्यातील २० घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तर, नाल्यावरून वाहणाऱ्या पाण्यात एक बोलेरो पिकपही वाहून गेली आहे.
जोरदार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले असून नागरिकांचे हाल होत आहे. तुमसर तालुक्यातील सिंधपुरी गावात सकाळी सगुणाबाई शेंडे यांच्या घराची भिंत लगतच्या घरावर कोसळल्यामुळे ३ जण ढिगाऱ्याखाली दबले. गावकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी लगेच त्यां तिघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. मात्र, निलकराम इसराम शेंडे (५४) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांची मुलगी कुंदा नेवारे (२४) आणि निर्मला वगरे (५०) या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल करण्यात आले आहे.
लाखांदूर तालुक्यात २३० मिमी एवढा पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बऱ्याच घरात १ फूट ते ४ फूट पाणी शिरले. यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लाखांदूर तालुक्यातील २० घरांचे अंशतः नुकसान झाले असून प्रशासनातर्फे नुकसानाची पाहणी सुरू असल्याने ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
पवनी तालुक्यातही अतिवृष्टी झाल्याने काही गावातील घरात पाणी शिरल्याने सामानाची नासधूस झाली. तर, तालुक्यात ४० घरांचे अंशतः घरांचे नुकसान झाले आहे. भेंडाळा गावातील शाळेच्या मागे असलेल्या नाल्यात पडून २ री मध्ये शिकणाऱ्या डेव्हिड सोनटक्के(८) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
मोहाडी तालुक्यातील खमारी गावातील शेतकरी केशव जागो मेश्राम (४५) शेतीचे काम करून सूर नदी मार्गे घरी परत येत असताना अचानक वाहून गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. भंडारा तालुक्यातील चांदोरी या गावाला जोडणाऱ्या नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. तर, नाल्यावरून वाहणाऱ्या ४-५ फुटाच्या पाण्यातून एक बोलेरो पिकप काढण्याच्या प्रयत्नात वाहून गेल्याने गाडीत असलेल्या पाचही जनावरांचा मृत्यू झाला. तर, चालकाने गाडीतून उडी घेऊन स्वतःचा जीव वाचवला.